प्रतिनिधी -निशिकांत रोडगे सेलू

श्रीराम प्रतिष्ठान, सेलू संचलित जिज्ञासा बालविहार व एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व राजे यशवंतराव होळकर शैक्षणिक योजनेअंतर्गत अनेक आदिवासी विद्यार्थी गुणवत्तापूर्ण इंग्लिश माध्यम शिक्षण घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर शाळा व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्राची लोकधारा” या संकल्पनेवर आधारित भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दि. २९ डिसेंबर, सोमवार रोजी सकाळी १० वाजता साई नाट्य मंदिर, सेलू येथे उत्साहात पार पडला.
महाराष्ट्रातील विविध लोककला, परंपरा, लोकनृत्ये व सांस्कृतिक वारसा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी कार्यक्रमांतून साकारण्यात आला. लावणी, पोवाडा, कोळी नृत्य, गोंधळ, भारूड, आदिवासी नृत्य अशा लोककलेच्या सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी अध्यक्षीय भाषणात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्लिश माध्यमाच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक शिक्षण देण्यात येत असून, राजे यशवंतराव होळकर शैक्षणिक योजनेद्वारे त्यांना शैक्षणिक प्रवाहात सक्षमपणे सहभागी करून घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख पाहुणे भागवत दळवे यांनी आपल्या भाषणात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता व उपक्रमशीलतेबाबत समाधान व्यक्त केले, तर भास्कर पडघन यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमास संचालक श्री. भास्कर पडघन, संचालक अँड. दत्तराव कदम, अनिल बर्डे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, सेलू), किशोर कारके (सरपंच गोमेवाकडे), नारायण पाटील (तालुका प्रतिनिधी, दैनिक सामना), भागवत दळवे, प्रभाकर गजमल, श्रीपाद कुलकर्णी (तालुका प्रतिनिधी, दैनिक देवगिरी), संजय गटकळ, दत्ताराव गाते आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंचावर संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर यांच्यासह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाचे संचालन शीतल अबुज व वैष्णवी कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थी संचलन पायल गायकवाड हिने केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम प्रतिष्ठान संचलित विविध घटक संस्थांमधील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास पालक व रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली.
