सेलू उपजिल्हा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमधील एअर कंडिशनर (एसी) गेल्या बारा दिवसांपासून बंद असल्याने रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. या काळात सिझेरियनसह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या असून, रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एसी बंद असल्याने थिएटरमधील तापमान अत्याधिक वाढले आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरणाचे नियम पाळणे अशक्य झाले असून, संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सिझेरियनसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना खासगी रुग्णालये किंवा परभणी जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. तसेच, रुग्णालय प्रशासनाने “102” या आपत्कालीन क्रमांकावर कॉल केल्यानंतर मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती दिली आहे.
या परिस्थितीमुळे गरीब आणि ग्रामीण भागातील रुग्णांवर अतिरिक्त आर्थिक ओझे पडले आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेताना त्यांना मोठा खर्च करावा लागत असून, सर्वसामान्य रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत क्लेशदायक ठरत आहे.
“ऑपरेशन थिएटरमधील एसी दुरुस्तीसाठी काम सुरू असून, दोन दिवसांत एसी सुरू होईल,” असे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष देशमुख यांनी सांगितले.
तथापि, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सरकारी रुग्णालयात एसीसारख्या मूलभूत सुविधाही सुरळीत नसतील तर गरीब रुग्ण कुठे जाईल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले तरी, कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून लवकरात लवकर एसी दुरुस्ती पूर्ण करून ऑपरेशन थिएटर पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.
https://shorturl.fm/OUwY4