सेलू : दर्पण दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा बुधवार, दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी श्रीराम प्रतिष्ठान, विद्याविहार शैक्षणिक संकुल, रवळगाव रोड, सेलू येथे उत्साहात व सकारात्मक वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात तालुका व जिल्ह्यातील विविध माध्यमांशी संबंधित पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्री. लक्ष्मण बागल, श्री. शिवाजी आकात, ज्येष्ठ पत्रकार श्री. नारायण पाटील, श्री. विलास मोरे, श्री. मोहन बोराडे, श्री. सतीश आकात, श्री. कांचन कोरडे, श्री. श्रीपाद कुलकर्णी, श्री संजय मुंढे, श्री. नीरज लोया, श्री. निशिकांत रोडगे, पुनमजी खोना, वसंत आवटे, श्री. दिलीप डासाळकर, श्री. अबरार बेग, श्री. उत्तम लोखंडे, श्री. विठ्ठल राऊत, श्री. सचिन राऊत, श्री. निळकंठ पवार. आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या जडणघडणीत पत्रकारितेचे योगदान अनन्यसाधारण असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करणे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार बांधवांचा मानपत्र, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनीही पत्रकारितेचे सामाजिक महत्त्व, सत्यनिष्ठा व निर्भीड लेखन याबाबत विचार मांडले.
यावेळी बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे म्हणाले, “पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्यांचे संकलन नव्हे, तर समाजातील वास्तव आरशासारखे मांडण्याचे धाडस आहे. सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर पत्रकार काम करत असतात. अनेक अडचणींवर मात करत पत्रकार समाजहितासाठी सतत कार्यरत राहतात, हे कार्य प्रेरणादायी आहे.
दर्पण दिनाच्या निमित्ताने पत्रकार बांधवांचा सन्मान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. श्रीराम प्रतिष्ठान समाजहिताच्या उपक्रमांबरोबरच समाजाला योग्य दिशा देणाऱ्या पत्रकारितेच्या पाठीशी नेहमी ठामपणे उभे राहील.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर टाके यांनी सुयोग्य पद्धतीने पार पडले तर उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.