
प्रतिनिधी -निशिकांत रोडगे सेलू
सेलू : दिनांक 26 रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित डॉ. राम रोडगे अध्यापक महाविद्यालय, सेलू येथे शैक्षणिक वर्षातील पदवीदान समारंभ अत्यंत सन्मानपूर्वक वातावरणात संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे हे विराजमान होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नूतन महाविद्यालय, सेलू येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. निर्मला पद्मावत उपस्थित होत्या. तसेच डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे यांच्यासह अन्य मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. संजय रोडगे यांनी सांगितले की, शिक्षक हा समाज घडविणारा महत्त्वाचा घटक असून भावी पिढीच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण आहे. बी.एड. शिक्षण पूर्ण करून आज पदवी स्वीकारणारे विद्यार्थी हे उद्याचे आदर्श शिक्षक असून त्यांनी केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्ये व नैतिकता रुजविण्याचे कार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांनी काळानुरूप बदल स्वीकारून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शिक्षणात करावा तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व सामाजिक जबाबदारी जपत आपल्या कार्यातून संस्थेचे व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते बी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 64 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मीनाक्षी रत्नपारखी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी नायकल यांनी प्रभावीपणे केले, तर समारोपप्रसंगी पवन पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सोनवणे बी. के., प्रा. उघडे एस. ए., प्रा. थोरात बी. जी., पामे बी. बी., शिंदे बी. के., काकडे पी. बी., पुंडकरे के. बी., गायकवाड एस. पी. तसेच सोनार जी. बी. यांनी विशेष परिश्रम घेतले.
