प्रतिनिधी -निशिकांत रोडगे सेलू
सेलू जि.परभणी : सेलू नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवक पदाच्या जागेसाठी मंगळवारी, २ डिसेंबर रोजी सकाळी ७:३० ते ५:३० या वेळेत मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण ५० केंद्रावरील मतदान पथके सोमवारी रवाना झाली असून सर्व मतदान केंद्रे व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण ४४ हजार ९९३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २२ हजार ५९६ पुरूष, आणि २२ हजार ३८८ महिला मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.शिवाजी मगर, तुकाराम कदम यांची उपस्थिती होती. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून, पाच संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष अतिरिक्त पोलिस दल तैनात राहणार आहे. १३ प्रभागात एकूण ५० मतदान केंद्रे आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक पाच मधील मतदान केंद्र क्रमांक ४ हे सखी बुथ असणार आहे. ७ मतदान पथके राखीव आहेत. ३० केंद्रावर महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी प्रत्येकी एक महिला अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. याठिकाणी सर्व महिला मतदान अधिकारी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत. सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून सायंकाळी ५:३० वाजता रांगेत असणार्या सर्व मतदारांना उलट्या क्रमाने चिठ्ठी देऊन त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, तसे आदेश सर्व मतदान केंद्राध्यक्ष यांना देण्यात आले आहेत.
एकूण सहा क्षेत्रीय अधिकारी, असून त्यांच्या सोबत प्रत्येकी दोन मास्टर ट्रेनर असणार आहेत. मतदान पथकांसोबत प्रथोमपचार वैद्यकीय किट, ओआरएस आदी औषधी दिली आहेत.
मतदान संपल्यानंतर सर्व मतदान साहित्य संध्याकाळी तहसील कार्यालय परिसरात जमा करून घेण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व सीलबंद मतदान यंत्रे निवडणुक निर्णय अधिकारी उमेदवार, प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंगरुममध्ये जमा केली जाणार असल्याची माहितीही श्री.भोसले यांनी दिली.
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे
सेलू नगरपालिकेसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी स्वीप अंतर्गत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे.
त्यामुळे नव मतदारांसह सर्व जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून, लोकशाहीच्या या महाउत्सवात सहभागी व्हावे आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रेरित करावे, मतदान शांततेत व सुरळीत होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी श्री. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शिवाजी मगर, तुकाराम कदम,
नायब तहसीलदार गजानन इनामदार, जयश्री कोल्हे, विजय मोरे, मुकुंदराव आष्टीकर, हरिष टाक, स्वप्नील बडवे, अमोल खेडकर आदींसह अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यावर आहेत.
पोलिसांसह ४०० अधिकारी, कर्मचारी
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवडणूक निरीक्षक राजेश काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू नगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांतता आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी ५० केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांसह ४०० अधिकारी, कर्मचारी यांची नेमणुक करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी (परभणी ग्रामीण) चंद्रशेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपक बोरसे, सहायक पोलिस निरीक्षक आठ, महिलासह १०३ पोलिस अंमलदार, होमगार्ड १०० तैनात करण्यात आले आहेत. संवेदशील मतदान केंद्रावर अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सहा व्हिडिओ कॅमेराद्वारे मतदान केंद्र व परिसरात नजर राहणार आहे.
पाच फेऱ्यात मतमोजणी
सेलू नगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी प्रकिया ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. सकाळी ८:३० स्ट्रॉंग उघडण्यात येणार असून उमेदवार तसेच मतदान प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, याबाबत कळविण्यात आले आहे.
एकूण १३ प्रभागातील मतमोजणीसाठी १३ टेबल असणार आहेत. मतमोजणीच्या एकूण पाच फेऱ्या होणार असून प्रकिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. यासाठी यंत्रणा सज्ज आहे.
फोटो ओळी – सेलू नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक मतदानाचे साहित्य तपासून घेण्यासाठी मतदान अधिकारी- कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, डॉ.शिवाजी मगर, तुकाराम कदम, दीपक बोरसे आदींची उपस्थिती होती.
पूर्ण
