सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अनुदानाबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता, काही कर्मचाऱ्यांनी “सगळे शेतकरी एकत्र व्हा आणि थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जा” असा सल्ला दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.शेतकरी सांगतात की, “पंचनामे पूर्ण झाले आहेत, माहिती प्रणालीत नोंदी आहेत, पण खातेभरती होत नाहीये. त्यामुळे आम्ही तहसील कार्यालयात विचारायला गेलो, तेव्हा आम्हाला राजकीय व्यक्तीकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला.”
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी व काही दैनिकाच्या पत्रकारांनी कॉल किंवा व्हाट्सअप वर तहसीलदारांना काही थेट प्रश्न विचारले आहेत:
अनुदान वितरणाची सद्यस्थिती काय आहे?
किती अर्ज प्रलंबित आहेत?
अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासन कोणती कारवाई करणार आहे?
तहसीलदारांकडून मात्र अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तात्काळ मिळावे, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.